असेही धाडस! रूपालीने पळवून लावला वाघ; भंडारा जिल्ह्यातील घटना

Posted By: BUTIBORI.INFO - 21:11:00

Share

& Comment

असेही धाडस! रूपालीने पळवून लावला वाघ; भंडारा जिल्ह्यातील घटना

एका तरूणीने हिंमतीच्या बळावर जंगलाच्या राजाला पळवून लावल्याची सत्य घटना आहे. अंगावर थरकाप उडविणारी ही घटना साकोली तालुक्यातील ऊसगाव येथील असून रूपाली राजकुमार मेश्राम असे या जिगरबाज तरूणीचे नाव आहे.
भंडारा : मध्यरात्रीची वेळ. घराबाहेर बांधलेल्या शेळीने माणसासारखा हंबरडा फोडला. काय झाले, हे बघण्यासाठी २१ वर्षीय तरूणीने दार उघडला. कुठेही काहीच दिसले नाही, पण शेळी रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. तरूणी मागे वळली. एवढ्यात कुणाची तरी सावली तिला दिसली. तरूणीने पुन्हा दाराकडे वळून बघितले. समोर साक्षात जंगलाचा राजा ऐटीत उभा. क्षणाचाही विलंब न लावता वाघाने तरूणीवर हल्ला चढविला. दोघांच्या झुंजीत विजय शेवटी तरूणीचा झाला.
ही कुठल्या एका चित्रपटातील ‘स्टोरी’ नव्हे तर एका तरूणीने हिंमतीच्या बळावर जंगलाच्या राजाला पळवून लावल्याची सत्य घटना आहे. अंगावर थरकाप उडविणारी ही घटना साकोली तालुक्यातील ऊसगाव येथील असून रूपाली राजकुमार मेश्राम असे या जिगरबाज तरूणीचे नाव आहे. या हल्ल्यात रूपाली व तिची आई जखमी झाली. जिजाबाई स्वस्थ असून रूपालीवर मात्र नागपूर वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत.
२४ मार्च २०१८च्या मध्यरात्रीच्या सुमारस हा घडलेला थरारक प्रकार रूपाली आजही निर्र्भयतेने सांगते. वाघाने हल्ला चढविताच रूपालीच्या डोक्यावर, कमरेवर दोन्ही हात व पायावर जबर दुखापत झाली. रक्ताची धार वाहू लागली. काय करावे, सुचेना. पण लढण्याची हिंमत कमी होत नव्हती. वाघ दिसताच भल्यांभल्याची दातखीळ बसते. पण रूपाली विचलीत झाली नाही. वाघाला प्रतिउत्तर देत असतानाच आई जिजाबाईनेही काठीने वाघावर प्रहार केला. यात वाघाने जिजाबाईवरही हल्ला केला. हिंमतीच्या बळावर वाघाला पळवून लावायचंच, असा चंग बांधून रूपालीने पुन्हा त्याच्यावर प्रहार केला. या प्रहाराने वाघाच्या मनात भीती आली असावी आणि क्षणार्धात त्याने तिथून धूम ठोकली. या ठिकाणी घरे दूरवर असल्याने आवाजही शेजाऱ्यांना पोहचेना. वाघाने पळ काढल्यानंतर दरवाजा बंद केला. रक्ताच्या थारोळ्यात असतानाही हिंमतीने रुपालीने मोबाईलवरून फोन करून घडलेली घटना कळविली..
दोघींनाही लगेचच उपजिल्हा रूग्णालय साकोली येथे दाखल करण्यात आले. दोन दिवसांच्या उपचारानंतर जिल्हा सामान्य रूग्णालयात ‘रेफर’ करण्यात आले. रूपालीला गंभीर दुखापत असल्याने तिला नागपूर येथील मेडिकल कॉलेजला ‘रेफर’ करण्यात आले. घटनेला आठ दिवसांचा कालावधी लोटला असला तरी वनविभागातर्फे या मायलेकींना आर्थिक मदत मिळालेली नाही. हातात जेवढी रक्कम होती खर्च झाली. औषधोपचाराला पैसा लागत नाही. पण इतर खर्च पूर्ण करण्यासाठी अंगावरील सोने-चांदीचे खळेही मेश्राम यांनी विकले. घरात अठराविश्व दारिद्रय. पदवी अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या रूपालीला या घटनेने बळ जरूर दिले, पण आर्थिक मदत मिळालेली नाही.

About BUTIBORI.INFO

Techism is an online Publication that complies Bizarre, Odd, Strange, Out of box facts about the stuff going around in the world which you may find hard to believe and understand. The Main Purpose of this site is to bring reality with a taste of entertainment

Copyright © 2013 Butibori News - बुटीबोरी न्यूज़™ is a registered trademark.

Designed by https://www.youtube.com/channel/UCUqpTcjiMyc5CxXvVb_qOoQ/videos?disable_polymer=1. Powered By Blogger | Published By https://www.youtube.com/channel/UCUqpTcjiMyc5CxXvVb_qOoQ/videos?disable_polymer=1