वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार कार्यक्रमाचे उदघाटक
गत सात वर्षांपासून कासवगतीने सुरु असलेले बुटी बोरी येथिल जलशुद्धीकरण प्रकल्पाचे काम पूर्ण होताच दि.१६ फेब्रु ला रात्री ९:०० वाजता या प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा राज्याचे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे हस्ते पार पाडला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हिंगणा विधानसभा क्षेत्राचे आ.समीर मेघे तर प्रमुख अथीती म्हणून बुटी बोरी अर्जुन सामाजिक संघटनेचे अध्यक्ष बबलू गौतम,आकाश वानखेडे,प्रवीण शर्मा,विनोद लोहकरे,दिलावर खान,हिंगणा प स उपसभापती हरिश्चंद्र अवचट,देवराव डोईफोडे आदी उपस्थित होते. महत्वाची बाब म्हणजे यासंदर्भात दि.१६ डिसें २०१७ ला “बुटी बोरी जलशुद्धीकरण प्रकल्पाचे भिजत घोंगडे!” या शीर्षकाखाली दैनिक देशोन्नती ने बातमी प्रसिद्ध करून शासनाच्या कामातील दिरंगाई वर खरपूस समाचार घेताच अवघ्या दोन महिन्यात उर्वरित कामे पूर्ण करून जलशुद्धीकरण योजना जनतेच्या स्वाधीन करण्यात आली.
राष्ट्रीय पेय जल कार्यक्रम अंतर्गत बुटी बोरी येथील जल शुद्धीकरण प्रकल्पाच्या ८ करोड ०६ लक्ष रुपयांच्या कामाला सन २०११ -१२ ला मंजुरी मिळाली होती.परंतु या जल शुद्धीकरण योजनतेला सात वर्षे लोटूनही या प्रकल्पाचा कुठलाही लाभ जनतेला मिळत नसल्याने शासन दरबारी या प्रकल्पाचे भिजत घोंगडे असल्याचे दिसून येते होते.
विशेष म्हणजे बुटी बोरी हे आशिया खंडातील सर्वात मोठे औदयोगिक क्षेत्र आहे.याठिकाणी १९९१ ला पंचतारांकित औधोगिक क्षेत्राची स्थापना झाली.त्यामुळे औधोगिक क्षेत्रातील असलेल्या विविध उद्योगाचे रसायनयुक्त पाणी हे वेना नदीत सोडत असल्यामुळे नदीचे पाणी दूषित होऊन पिण्यायोग्य तर नाहीच पण बाहेरील वापराच्याही कामी येत नसल्याने येथे जलशुद्धीकरण प्रकल्पाची गरज जाणून तत्कालीन सरपंचा संगीता लाखोटे यांनी ग्रामपंचायत बुटी बोरी येथे जलशुद्धीकरण प्रकल्पाचा ठराव घेतला होता.सुरुवातीला या योजनेला ३ करोड ६० लक्ष मंजूर करून साई कॉन्स्ट्रकशन कंपनीला कामाचा ठेका रीतसर दिला होता.परंतू संबंधित प्रकल्प ३ करोड ६० लक्ष रुपयात पूर्ण होऊ शकत नाही अशी सबब पुढे करून त्यांनी दोन वर्षे काम रोखुन धरले व प्रकल्पाची रक्कम वाढवून घेतली.या जलशुद्धीकरण प्रकल्पा अंतर्गत ८ करोड ०६ लक्ष रुपयात दोन पाण्याच्या (४लक्ष, ७लक्ष ५०हजार) लिटर पाण्याची क्षमता असलेल्या टाक्या,१८ किमी असलेली पाईप लाईन,पाण्याची विहीर,पंपिंग मशीन व जलशुद्धीकरण संयंत्र असे एकंदरीत काम केले आहे.
बुटी बोरी ग्रा प अंतर्गत ६ प्रभाग असून सण २०११ च्या जनगनने नुसार येथील लोकसंख्या २९ हजार ६६७ इतकी होती.ती आज घडीला ३५ हजारावर असून औधोगिक क्षेत्रातील काम करणारे भाडेकरू पकडून ५० हजाराचे वर आहे. येथे एकूण २६ सार्वजनिक विहिरी आहे.त्यातील १ कायम बंद,८ पिण्यास योग्य व १६ वापरात आहे.तर सार्वजनिक हातपंप १०१,९ कायमचे बंद,३४ पाणी पिण्यास योग्य तर ५८ बाहेरील वापरा करीता आहे.ग्रा प मालकीच्या ३ पाण्याच्या टाक्या असून त्यांची क्षमता छोटी बोरी येथील ३० हजार,जुनी वसाहत येथील ९० हजार तर नवीन वसाहतीतील १ लक्ष ३० हजार असे एकूण २लक्ष ५० हजार अशी एकूण १२ लक्ष लिटर पाण्याची व्यवस्था ग्रा प कडून नागरिकांकरिता केली जात होती. परंतु ग्रा प अंतर्गत राहत असलेल्या एकूण लोकसंख्येचा विचार केल्यास व प्रति व्यक्ती दिवसभराचा पाणी वापर ४० लिटर प्रमाणे रोज बुटी बोरीत २०लक्ष लिटर पाण्याची गरज असतांना ग्रामपंचायत प्रशासन गावातील जनतेला पाणी पुरवठा करण्यास अक्षम होते.परंतु जलशुद्धीकरण प्रकल्पामुळे हि समस्या दूर होऊन बुटी बोरी येथील जनतेला आता दररोज मुबलक पाणी मिळु शकेल.भविष्यातील वाढते औधोगिक क्षेत्र व वाढती लोकसंख्या बघता येथे पाण्याच्या सोयी करिता पुन्हा ५ करोड रुपये देण्याचे आश्वासन वित्तमंत्री मुनगंटीवार यांनी आपल्या उदघाटकीय भाषणातून केले.
Share
& Comment
Tweet